असे का ?

लहानपणापासून मला पडणारे असंख्य प्रश्न. त्यांतील कांही निवडक ………

१. पेरुची बी आणि दांतातली फट एकाच मापाची का असते ?
२. प्रत्येक लग्नांत एकतरी दांताची फणी ओठाबाहेर पसरलेली स्त्री का असते ?
३. हंसताना बहुतेक बायका तोंडावर हात का धरतात ?
४. नथ घातल्यावर आपण चांगले दिसतो असा सार्वत्रिक गैरसमज का आहे ?
५. मुहूर्ताची वेळ न पाळता त्यानंतरही मंगलाष्टके का म्हणत रहातात ?
६. मंगलाष्टके म्हणणाऱ्यांना आपण सुरेल गातो असे का वाटते ?
७. कांही लोकांचे तोंड कायम उघडे का असते ?
८. आपण काहीच म्हणालो नसताना समोरचा माणूस ‘काय म्हणताय?’ असे का विचारतो?
९. लांब पल्ल्याच्या गाड्यांची दारे एका वेळेला एकच माणूस आंतबाहेर करु शकेल इतकी लहान का असतात ?
१०. रिझर्व्हेशनच्या डब्यांत शिरताना आपण नेमके आपल्या सीटच्या विरुद्ध दिशेने आंत का शिरतो?
११. दादर (मध्य) स्टेशनच्या प्रत्येक उदघोषणेमागे एक प्रश्नचिन्ह का असते ?
१२. लोकलमधे आपल्याच सीटच्या खाली आवाज करुन दचकवणारा काँप्रेसर का असतो?
१३. लोकलमधे पंख्यांना स्विच ठेवण्याऐवजी कंगवेच का नाही ठेवत ?
१४. सर्व फेरीवाले आवाजाचे स्पेशल ट्रेनिंग घेऊन आलेले असतात का ?
१५. डाऊन आणि अप हे कोणत्या दिशांच्या आधारे ठरवतात ?
१६. टाईमटेबल मधे छापलेले खाद्यपदार्थाचे दर कोणत्या जमान्यातले असतात ?
१७. लोकांना ‘पूल’ वापरायला सांगणाऱ्या रेल्वेचे कर्मचारी स्वत: रुळ का ओलांडतात ?
१८. हवाईअड्डा हे नांव ‘सर्व प्रकारच्या गुन्हेगारांचे स्थान ‘ या अर्थाने ठेवले असेल का ?
१९. परदेशी जाताना चित्रविचित्र पोशाख का घालावे लागतात ?
२०. कुठलीही माहिती न लपवता आपली ‘योजना’ सांगणारी मोबाईल कंपनी आस्तित्वात आहे का ?
२१. मराठी वाहिन्यांवर कायम ‘अशुद्धलेखन का असते ?
२२. ठळक बातम्या सांगताना शक्य तेवढा वाद्यांचा गोंगाट का करतात ?
२३. दु:खद बातमी सांगतानाही काही वाहिन्यांवर मागे तबले का बडवले जातात ?
२४. बोलण्याची सुरवात संवाददात्याला कायम ‘देखिये’ या शब्दानेच का करावी लागते ?
२५. मुलाखतींच्या कार्यक्रमात दूरध्वनीवरुन प्रश्न विचारणारे मानसिकदृष्ट्या सक्षम असतात का ?
२६. सर्वात आचरट जाहिरातीचे बक्षीस टीव्हीला मिळेल का एफेम रेडिओला ?

विक्रमादित्याची दिनचर्या

विक्रमादित्याला आज पहाटे पांच वाजताच जाग आली. पूर्वी यावेळेस तो फिरायला जायचा. प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टरांनीच त्याला तसे बजावले होते. सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा फायदा त्याच्या तब्येतीला तर झालाच, शिवाय सकाळी कोणकोण मोठे लोक भेटले आणि मी त्यांनाही कसे सुनावले याच्या कथाही मित्रांना सांगता यायच्या. पण त्याचाही आताशा कंटाळा येऊ लागला होता. डॉक्टरला काय कळतंय, त्याने तर आपल्याला सिगरेट ओढायलाही बंदी घातलीये, असा विचार करून पडल्या पडल्याच विक्रमादित्याने एक सिगारेट शिलगावली. आज कारखान्यांत कोणाला बोलून झोडायचे, कोणाचा पाणउतारा करायचा याचा विचार करता करता दोन सिगरेटी संपल्या देखील!
मग झटक्यात उठून त्याने सगळी आन्हिके उरकली. बायकामुलांवर ताशेरे झाडतच तो तयार झाला. स्टेशनवर जायला लवकर रिक्शा न मिळाल्याचा राग कोणावर काढावा या विचारात आणखी एक सिगरेट चुरगाळली. प्रवासात त्याचा नेहमीचा ग्रुप होताच, त्यांतच तोंडी लावायला एक नवीन पाहुणाही होता. पाहुण्याच्या दुर्दैवाने तो मराठी होता! गाडी सुरू होताच विक्रमादित्याने आपली पोतडी सोडली. आधी मराठी माणसाच्या नाकर्तेपणाबद्दल फैरी झाडल्या. मग आपल्या सोन्यासारख्या देशाची कशी वाट लागली आणि त्याला तुम्हीच सगळे (मी सोडून) कसे जबाबदार आहात हे प्रभावीपणे पटवून दिले. त्यानंतर अमेरिकेचे गुणगान करून सर्व मोठ्ठ्या हस्तींशी माझी कशी ओळख आहे हे बोलण्याच्या ओघात पाव्हण्याला खुबीने सांगितले. बिचाऱ्या पाहुण्याचा वासलेला आ बंदच होत नव्हता. नेहमीच्या ग्रुपला मात्र अजीर्ण झाले होते. त्यांना आतापर्यंत सगळेच डायलॉग तोंडपाठ झाले होते. पाहुण्याला अजून जरा घोळात घ्यावे या धूर्त हेतूने, त्याने दुपारच्या जेवणाचे आमंत्रण दिले.
कारखान्यात पाऊल टाकताक्षणी विक्रमादित्याच्या जणु अंगात संचारले! सलामीला दाराशीच गुरख्याला कडक सलाम कसा ठोकायचा ते सुनावले. सुपरवायझर व अन्य दोनतीन कर्मचाऱ्यांना स्वच्छता न राखल्याबद्दल यथेच्छ शिवीगाळ केली. नंतर एकदोघांना फोन करण्याचा प्रयत्न केला. फोनचे यंत्र नीट चालत नसल्याचा संशय आल्याबरोबर फोनच उचकटून कोपऱ्यात भिरकावला आणि पार्टनरवर जोरात ओरडून एक नवीन फोन आणण्याचे फर्मान सोडले! भेटायला एकदोन ठेकेदार व सप्लायर्स आले होते. त्यांना इतक्या लवकर पैसे मागितल्याबद्दल गुरकावले. अत्यंत अपराधी मुद्रेने ते बिचारे खाली मान घालून चालते झाले. हे सर्व चालू असताना चहापानाचा व धुम्रपानाचा यज्ञ अखंडपणे चाललाच होता. लवकरच विक्रमादित्य कंटाळला. दर पांच मिनिटांनी नवीन काही घडले वा बिघडले नाही की तो असाच कंटाळत असे.
मग त्याने कारखान्यात एक फेरी मारली. विक्रमादित्याच्या कल्पनेची भरारी फार मोठी होती. आजवरचे यश केवळ त्याच्याच सुपीक ‘किडनीतून’ (त्याचा आवडता शब्द) बाहेर पडलेल्या अफाट कल्पनांमुळे मिळाले होते. रूढ प्रथेपेक्षा अनेक वेगळी व नवीन यंत्रे स्वतःच्या डोक्याने बनवून घ्यायची आणि ती चालवून बघायची हा त्याचा आवडता छंद होता. ती चालली तर ठीक नाहीतर त्याची जागा अडगळीत! आज असेच एखादे नवीन यंत्र आणून कुठे ठेवावे या विचारांत असताना त्याला एकदम जाणवले की आता नवीन काही ठेवायला कारखान्यात जागाच नाही! त्यासाठी ताबडतोब एक नवीन कारखाना काढण्याचे नक्की झाले. विक्रमादित्य खुश हुआ! कारण आता निदान सहा महिने तरी त्याच्या किडनीला भरपूर काम मिळणार होते. नवीन जागी प्रायोगिक यंत्रांसाठी खूप जागा ठेवायची. पुन्हा एकदा सगळ्यांना आपल्या बुद्धीची चमक दाखवायची!! पैसे काय कोणीही भxx कमावतात. पण सतत काही नवीन करायला अक्कल लागते. आणि ती तर दुसऱ्या कोणाकडेच नाही.
दुपार झाली. पाहुणा जेवायला आला. त्याला नोकरी सोडून व्यवसाय करणे हेच कसे पुरूषार्थाचे लक्षण आहे हे पटवून देण्यात आले. कारखाना आपल्या गतीने चालूच होता. पाहुण्याला सर्व यंत्रे व संयंत्रे दाखवून संमोहित अवस्थेत पाठवून देण्यात आले.
संध्याकाळ झाली. विक्रमादत्य आता फार दमला होता. शरीर थकले होते डोळ्यांवर झापड येत होती. परत जायची वेळ होऊन गेल्यामुळे इतरांची चुळबुळ सुरू झाली. पण आत्ताच आपण निघालो तर इतरांना वेळेवर घरी जाण्याची चटक लागेल या भीतिने विक्रमादित्याने चर्चेचे गुऱ्हाळ चालू केले. अगदीच नाईलाज झाल्यावर त्याने आपली धोकटी उचलून स्टेशनचा रस्ता धरला.
रात्री घरी पोचला तोपर्यंत सर्वजण जेवून टी.व्ही. पहात होते. कसेबसे जेवून घेतल्यावर तो शयनगृहात गेला. सगळे अंगांग दुखत बिछान्यावर पहुडलेला तो पुरुषसिंह फार उदास होता. पण थकूनभागून कसे चालले असते ? उद्या सकाळी उठून परत धांवायचे होते. वेळ कमी होता. कारण या जन्मातही विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नव्हता !!!

अध्यात्माचे विज्ञान

नुकताच माझा एक अध्यात्म वाला मित्र येऊन गेला. माझी मते चांगलीच ठाऊक असल्यामुळे, तो कधी माझ्यासमोर तसले विषय काढत नाही. पण आज त्याला निकड होती. विज्ञान आणि अध्यात्म, या विषयावर त्याला एक लेख लिहायचा होता. वेळ कमी होता. तो विज्ञान शाखेचा नसल्यामुळे त्याला माझी मदत हवी होती. ‘तू मला नुसते मुद्दे दिलेस तरी चालेल, मी त्याचा योग्य तो विस्तार करीन’, असे त्याचे म्हणणे होते. मदत करण्याचा प्रयत्न करतो, एवढेच आश्वासन मी दिले. नंतर विचार करता करता ठरवले, आपल्याला जेवढे सुचते तेवढे लिहून काढायचे. ते वाचल्यावर, जालावरील ज्ञानी, बुद्धिमान आणि तैलबुद्धी असलेले मदतीचा हात देतीलच. निव्वळ या भरवशावर हे लिहिण्याचे धाडस करत आहे.

अध्यात्म म्हणजे आत्मा आलाच. आता या आत्म्याला विज्ञानात कुठे चिकटवायचा? मनांशी, आत्मा,आत्मा, आटमां, अ‍ॅटमा असे म्हटले. एकदम ट्युब पेटली. येस्स! आत्मा म्हणजे अ‍ॅटम! तो मॉलेक्युल बनवण्याच्या शोधांत. स्वार्थी आत्मे जास्तीतजास्त घेण्याच्या प्रयत्नांत. म्हणजे ते कमी ईलेक्ट्रॉन्स असलेले! परमार्थी आत्मे म्हणजे ईलेक्ट्रॉन रिच! द्यायला अगदी उत्सुक असलेले. म्हणजे आत्मा कसाही असो, त्याचा दुसर्‍याबरोबर मॉलेक्युल होणारच. लग्न म्हणजे दोन आत्म्यांचे मीलन. ते सिग्मा बाँड असतील तर लग्न टिकणार, पाय बाँड असतील तर घटस्फोटाची शक्यता जास्त! मला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. समाजातली डबल आणि ट्रिपल बाँड असलेली जोडपी दिसू लागली. त्यांना वाटत होते की आपले विवाहबंधन अगदी दृढ आहे, प्रत्यक्षांत परिस्थिती विपरीत! मैत्रीत देखील हाच बाँडचा कायदा लागू! मला अगदी जेम्स बाँड झाल्यासारखे वाटू लागले. चला, एक मुद्दा सापडला. त्याचा विस्तार ज्ञानी मंडळी करतीलच.

नामस्मरण. आता याचे महत्त्व कसे पटवायचे ? जितके नामस्मरण जास्त तितके पुण्य अधिक. सारखे एकच नांव जपल्याने काय होते? वास्तवाचा विसर पडून एक सुखद ग्लानी येते. म्हातारपणी, अल्झायमर झाला तरी रोज ते नांव असंख्य वेळा जपल्याने ते विसरणे अशक्यच. म्हणजे बाकीच्या जगाशी तुमचा तेवढा तरी संबंध रहाणारच. कुठल्याही विचारांनी वा कृतीनेसुद्धा, मेंदूत ईलेक्ट्रोकेमिकल सिग्नल जाणारच. मग नामस्मरणाने काय होते? मेंदूतल्या चुकीच्या जोडण्या दुरुस्त होतात, थोडक्यांत, म्हातारपणी झालेला अल्झायमर, बरा व्हायला मदत होते. द्यावे ठोकून!

होमहवन. ही वारंवार घरी करावे. त्यामुळे ६.५ फॅटच्या दुधापासून झालेले तूप असते, ते तुमच्या पोटांत जाऊन, तुम्ही तुंदिलतनु बनण्याऐवजी जाळले जाते. नुसते फेकून द्या असे सांगितले तर ते जीवावर येते. मंत्र म्हटल्याने पोटाच्या स्नायूंना व्यायाम होतो. धूर डोळ्यांत गेल्याने पाणी वाहून डोळे स्वच्छ होतात.

मंत्रजागर केल्यामुळे घरांत सगळीकडे मांगल्यच मांगल्य पसरते आणि आता आपले काहीही वाईट होणार नाही असे वाटून यजमानाला प्लासिबो इफेक्टचा लाभ होतो.

अध्यात्माच्या आसपासही कधी न फिरकल्यामुळे यापेक्षा जास्त मुद्दे कठीणच आहे. तरी सर्व वाचकांनी यांत मोलाची भर घालून सहकार्य करावे. एक परिपूर्ण लेख झाल्यास, एखाद्या आध्यात्मिक वाहिनीवर तो वाचला जाऊन आपल्या सगळ्यांच्या पुण्यात वाढ होईल.

जन्मोजन्मी

प्रत्येक माणसाला पुनर्जन्माबद्दल कुतुहल असतेच. मीही त्याला अपवाद नाही. मुले मोठी झाल्यावर, मी जेंव्हा निरवानिरवीच्या गोष्टी सुरू केल्या,. तेंव्हा एकदा माझी मुलगी मला म्हणाली होती,’ बाबा, तुला मरायची एवढी घाई का ?” त्यावर मी उत्तर दिले की मला पलिकडे काय आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता आहे. त्यातून मी आता माझ्या जबाबदार्‍यांतून मोकळा झालो आहे. आणि स्वतः मेल्याशिवाय सत्य काय आहे हे कसे कळणार? पण आत्महत्या हा मार्ग काही योग्य वाटत नव्हता. अचानक जिवंतपणीच ते जाणून घेण्याची एक संधी उपलब्ध झाली. नुकत्याच एका वाहिनीवर तुमचा पूर्वीचा जन्म जाणून घेण्याविषयी एक कार्यक्रम सुरू झाला. त्याचे काही भाग बघितल्यावर यावर विश्वास ठेवायचा की नाही हे नक्की ठरवता येईना. मग वाटले की स्वतःच जाऊन अनुभव का घेऊ नये? पण त्यासाठी तुम्हाला कशाची तरी भीति वाटायला पाहिजे किंवा एखादे सात जन्म पुरणारे व्यंग वा दु:ख असायला पाहिजे. अचानक मला आठवले की आपल्याला लहानपणापासून पालींची प्रचंड भीति वाटते. झाले! मी माझी एक कथा तयार केली आणि दिली त्यांना पाठवून! बरेच दिवस झाले म्हणून फोन केला तेंव्हा मोठ्ठी प्रतीक्षा यादी आहे असे कळले.
एके दिवशी बोलावणे आले. माझी कथा माझ्यासमोरच वाचून ती खरी आहे याचे एक प्रतिज्ञापत्र करुन त्यावर माझी सही घेण्यात आली. त्यानंतर त्यावर आधारित माझ्या गेल्या दोन जन्मांच्या कथा माझ्यासमोर ठेवण्यात आल्या. मी बुचकळ्यात पडलो. अजून संमोहनावस्थेत जाण्यापूर्वीच यांना माझे आधीचे जन्म कसे कळले ?
मला सांगण्यात आले , कथा नीट वाचून घ्या म्हणजे संमोहनावस्थेत तुम्हाला तीच आठवेल. मग तुम्ही फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची! बाकी सर्व आमच्यावर सोपवा.
एकूण असा प्रकार होता तर! मीही काहीही न बोलता मान डोलावली. मला लगेच एका गूढ वातावरणातल्या खोलीत झोपवण्यात आले. डोळे बंद करुन पडून रहायला सांगितले. प्रश्न सुरू झाले.
डॉ.: – आठवा, तुम्ही काय दिसताय? कुठे उभे आहात?
मी: – मी एका गल्लीत उभा आहे. समोर एक लोभस कुत्री उभी आहे.
डॉ: – कुत्री ? आणखी काय दिसताय ?
मी: – तिच्याभोवती तीन चार लुत लागलेले कुत्रे घोटाळताहेत. मला तिचा वास सुध्दा घेऊ देत नाहीयेत.
डॉ: – काय बोलताय? नीट आठवा.
मी: – हो, मी जवळ पोचलो. तिची मूक संमती घेतली. अरे देवा, त्यांनी माझ्यावर हल्ला चढवलाय. माझे लचके तोडताहेत.
डॉ:- तुम्ही हे काय बोलताय ?
मी: – मी जखमी झालोय, मी मरतोय!!! ओह, मी मेलो!
डॉ: – तुम्ही नक्की कोण आहात ?
मी: – मी एक कुत्रा आहे.
झाले! खोलीतले दिवे पटापट लागले. कोणीतरी कट कट असे ओरडले. मला डोळे उघडायला सांगितले.
डॉ: – हा काय चावटपणा चालला आहे ? तुम्हाला काय सांगितलं होतं ?
मी: – मी कुठे आहे ? मला का ओरडताय? मला मी काय बोलत होतो ते काहीच आठवत नाही.
डॉ: – खोटं! ऐका काय बरळत होता ते! (टेप लावला जातो. वरील संभाषण मला ऐकू येते.)
मी: – अरे बापरे! म्हणजे मला खरंच पहिल्या जन्माचे आठवत होते ?
डॉ: – तुम्ही खोटं बोलताय. तुमच्यावर संमोहनाचा काही परिणाम होत नाहीये. आमचा अमुल्य वेळ तुम्ही वाया घालवलाय. त्यासाठी तुम्हाला दंड करू.
मी: – त्याआधी तुम्ही लोकांना फसवून अंधश्रध्देकडे वळायला लावता आहेत अशी मीच पोलिसांत तक्रार करीन.
माझा नूर पहाताच ते सगळे नरमले. मी व माझ्या मित्रांना एकेक भेटवस्तु घेऊन घरी जाण्याचा आग्रह करु लागले.
आम्ही मात्र काहीही न घेता विजयी मुद्रेने , ताठ मानेने बाहेर पडलो.
बाहेर आल्यावर माझा मित्र पोट धरधरुन हंसायला लागला. म्हणाला, लेका तुझ्या अचाट् कल्पनाशक्तीला सलाम!
मी: अरे विश्वास ठेव, खरंच मला मागच्या जन्मातले आठवत होते. आणि कायरे, मागचा जन्म मनुष्याचाच असेल असे कोणी सांगितले???

(ही कथा असून पूर्णपणे काल्पनिक आहे आणि असे कधी घडलेले नाही कारण माझ्यावर संमोहनाचा काहीही परिणाम होत नाही हे मला चांगले ठाऊक आहे.)

मतिमंद

पुतळे कापा, पुतळे हलवा
फुंकून फुंकून निखारे फुलवा
एस्ट्या पेटवा, ट्रक जाळा
सामांन्यांच्या तोंडात बोळा
भैया पळवा, भैया मरवा
खळ्ळ-खटॅकची हौस पुरवा
कागद नाचवा, नोटा दाखवा
आदर्शांचे इमले चढवा
कांदे लपवा, टोमॅटो पळवा
रोजरोज नवे खेळ लावा
बारा मतींची ताकद लावा
मतीमंदांची प्रजा वाढवा ||

खळ्ळं खटॅक

बाबा मोबाईलवर कोणाचे तरी डॅमेजिंग एक्झरसाईज घेताहेत. आई मोबाईलवर गॉसिप करत खिदळते आहे. सोनु वर्तमानपत्र वाचायचा प्रयत्न करतो आहे.

सोनु : बाबा बाबा, खळ्ळ खटॅक म्हणजे काय ?

बाबा : अरे, व्हिडिओमधे चेहेरा दाखवू नका म्हणजे झालं तर. बाकी साहेब सांभाळून घेतील.

सोनु : आई, खळ्ळ खटॅक मंजे काय ?

आई : ते तुझ्या बाबांना विचार रे! अगं, तर मी काय म्हणत होते ? …….

सोनु : बाबा सांगाना ! (तेवढ्यात बाबांचा फोन संपतो)

बाबा : हं, सोन्या, मी सांगतो हं! कांच फुटली की आवाज कसा येतो माहिती आहे ना ? तोच तो आवाज.

सोनु : बाबा, पण मॉलमधे कशी काच फुटेल ? तिथे तर कितीतरी पहारा असतो.

बाबा : हो, पण हॉकी स्टिक मारली ना की मस्तपैकी काच फुटते.

सोनु : पण काच का फोडायची ?

बाबा : अरे काच ही फोडण्यासाठीच असते.अरे काय छान वाटतं तो आवाज ऐकला की !

सोनु : पण बाबा, परवा ताईनी ग्लास फोडला तर तुम्ही कित्ती रागावलात !

बाबा : अरे ग्लास आपला घरातला होता. घरातल्या काचा फोडल्या तर आपलं नुकसान होतं. म्हणून बाहेरच्या फोडायच्या.

सोनु : मग मी पण उद्या शाळेतल्या फोडतो. कित्ती कित्ती मज्जा येईल.

बाबा : अरे वेड्या, शाळेतल्या फोडल्यास तर प्रिंन्सिपॉल तुला शिक्षा करतील. हे बघ, मोठं झाल्याशिवाय काचा फोडायच्या नाही बरं का ! तू उद्या मोठा झालास ना माझ्यासारखा, की वाट्टेल तेवढ्या काचा फोड हं !

सोनु : पण मोठ्या लोकांना का नाही शिक्षा करत ?

बाबा : असं नाही काही, मोठ्या लोकांना पण शिक्षा होते पण फार मोठ्ठ्या लोकांना नाही करता येत. कारण हे शिक्षा करणारे काचेच्याच घरात रहातात आणि त्यांना या मोठ्ठ्या लोकांचीच भीति वाटते.

सोनु : पण का वाटते ?

बाबा : ते तू मोठठ्ठा झालास की कळेल .
बाबा काचवाल्याला फोन करतात. त्याला मोठ्ठे काम मिळालेले असते, त्यातल्या कमिशनची आठवण करायला.

विव्हळून

उघड्या कानांतून एक विव्हळणारा सूर घुसला
कोणा नवगायकाचा हायब्रीड, आंग्लाळलेला नंबर असणार
डोक्यात तीव्र झिणझिण्या, आन मनांत गांवरान शिव्या आल्या
संस्कारांचे चाप काढून, त्या मनसोक्त खुल्या आवाजात दिल्या.

पुन्हा पुन्हा कानात घुसणारे ते अभिजात संगीताचे विडंबन
कोण सालं सुरेल केकाटताय बाप मेल्यावाणी भो ….
नवीन पिढीची चव नासवून टाकतात
भ्रष्ट नकलेच्या सडलेल्या मेंदूंचे ……..

नांव विचारलं, तर तो आमचा आवडता ‘शंकर’ होता
मग मी, गपगुमान कानांत बोळे घालून चालू लागलो!

शुभंकरोति

शुभंकरोति

काही राजकीय नेत्यांच्या नातवंडांसाठी, पतवंडांसाठी, नवीन ‘शुभंकरोति’ लिहिण्याची नितांत गरज होती. मागणी तसा पुरवठा!

स्कॅमं करोति कल्याणम

भूखंड्म जलसंपदा

सुष्टबुद्धी विनाशाय

ब्रिगेडशक्ती नमोस्तुते ||

आजोबा, पणजोबा नमस्कार

तुम्हीच आमचे तारणहार

सर्वांना वाकून नमस्कार

दिवा लावला दिल्लीपाशी

आमची सत्ता घराण्यापाशी ||

बडवे

राम हवा,म्हणून
आम्ही ‘त्यांना’ बडवतो
काम हवे म्हणून
आम्ही ‘यांना’ बडवतो
आम्ही रामाचे दास
आम्हा बडवे होण्याचा ध्यास.

प्रश्नावली

हे यक्षाचे प्रश्न नाहीत. एका सश्रद्ध आदरणीय व्यक्तीने एका विज्ञाननिष्ठाला म्हणजे (माझ्यासारख्या माणसाला) विचारलेले बेसिक प्रश्न आहेत. त्याला मी माझ्या बुद्धीला झेपेल अशी उत्तरे दिली आहेत. संभाषण वैयक्तिक निरोपातून असल्यामुळे आत्तापर्यंत अप्रकाशित आहे. त्यावर चर्चा व्हावी या हेतूने इथे देत आहे.

१. मन खंबीर नसेल तर माणसाने अश्या प्रसंगी काय करावे?

मन खंबीर नसेल तर माणसाने परमेश्वराचा जरुर आधार घ्यावा.

२. विज्ञानाभिमुख होण्याने मन खंबीर होते काय?

माझे तरी झाले आहे.

३. कर्मकांड करणार्‍या सर्व लोकांची मने खंबीर नसतात काय?

असे मी म्हणणार नाही. ती व्यक्ती प्रत्यक्ष समोर असेल तर त्यावर भाष्य करता येईल.

४. विज्ञानाभिमुख असणार्‍या सर्व लोकांची मने खंबीर असतात काय?

उत्तर प्रश्न नं. २ प्रमाणेच.

५. “हिंदूंनी मयतानंतर दिवस घालू नये” हे ज्या हिरीरीने मांडता तितक्याच हिरीरीने “मुसलमानांनी-ख्रिश्चनांनी मृतदेह पुरू नये, जाळून टाकावेत” असे आपण सांगता का?

मी फक्त माझे मत नोंदवले. इतरांनी तसेच करावे असा माझा आग्रह नाही.

६. विज्ञानाभिमुख होणे म्हणजे सर्व मानवी भावनांना भडाग्नी (“मंत्राग्नी” शब्द टाळला आहे) देणे असा अर्थ आहे काय?

अर्थातच नाही. मानवी मन हे भावनांपासून मुक्त होणारच नाही. पण त्यावर ताबा मिळवता येणे शक्य आहे.

७. धर्म आणि विज्ञान मानवी जीवनांत गुण्यागोविंदाने नांदू शकत नाहीत काय?

नांदतील की. फक्त आपण जे आचरण करतो ते आपल्या बुद्धीला पटते का हा प्रश्न ज्याचा त्याने स्वतःला विचारावा.

८. ज्या ठिकाणी श्रद्धेचा प्रश्न येतो तेथे प्रत्येकाला आपापला मार्ग चोखंदळण्याची मुभा आहे असे आपणांस वाटते का?

नक्कीच, समाजसुधारणा जबरदस्तीने कधीच होणार नाही.

९. इतर लोकांची मानसिक अथवा शारीरिक हिंसा न करता जो-तो आपली श्रद्धा-अश्रद्धा बाळगण्यास स्वतंत्र आहे असे आपणांस वाटते का?

होय.

१०. जसे आस्तिकांनी आपल्यावर आस्तिकपणाची सक्ती करू नये असे नास्तिकांना वाटते. तसेच नास्तिकांनी आपल्यावर नास्तिकपणाची सक्ती करू नये यात आस्तिकांचे काय चुकले बरे?

अशी सक्ती मी माझ्या घरच्यांवरही करत नाही.

११. असेच शाकाहारी विरुद्ध मांसाहारी वादाबद्दलही म्हणता येईल असे वाटते का?

हो, नक्कीच.

१२. मग असेच विज्ञानाभिमुख विरुद्ध कर्मकांड करणारे याबद्दलही म्हणता येईल असे वाटते का?

हो येईल ना, पण विज्ञानवाद्यांना फक्त मत मांडण्याचा अधिकार असावा. मत दिले म्हणजे सक्ती केली असे नाही.