नाजूक – साजूक

एका लग्नाला नुकताच गेलो होतो. संध्याकाळी ७ ते १० अशी वेळ दिली होती म्हणून साधारण पावणेआठ वाजता पोचलो. तरीही प्रथेनुसार नवरा-नवरी स्टेजवर आलेच नव्हते. यजमान सर्वांना आधी जेवून घ्या असा प्रेमळ आग्रह करत होते. पण माझे दुसरे एक मित्र यायचे होते त्यामुळे त्यांची वाट पहायची ठरवून एका पांढर्‍याशुभ्र कव्हराच्या गुबगुबीत खुर्चीवर विसावलो. आजुबाजुला सुंदर सुंदर ड्रेसेस व साड्या नेसलेल्या (पाण्याला ‘अ‍ॅव्ह’ म्हणतील अशा) ललना विहरत होत्या. अनेक संभाषणे कानावर पडत होती. पण एका वैशिष्ठ्यपूर्ण बोलण्याने माझ्या कानांचा ताबा घेतला.
” हाय,… अगं किती दिवसांनी भेटतोय आपण! वॉव, आणि किती क्युट दिसतीयेस तू !!!
ए, काय गं चेष्टा सुचतीये तुला, पन्नाशी उलटलीये , घरात सून आहे, नातवंडं आहेत!
असु देत गं. पण तू कित्ती कित्ती ‘मेनटेन’ केलयंस , नाहीतर आमचं काय झालंय बघ ना.
छे गं, मला नुकताच तो ‘चिकन गुनिया’ नव्हता का झाला? त्यामुळे माझी अगदी वाईट्ट स्थिती झालीये.
साध्या दोन तीन पायर्‍या उतरायच्या झाल्या तरी मला ह्यांचा हात धरावा लागतो. दोन आठवड्यांपूर्वी आम्ही युरोपला गेलो होतो ना, तेंव्हा प्लेनमधून उतरताना मला माझी पर्ससुद्धा जड झाली बघ. ह्यांनी लगेच पुढे येऊन ती घेतली म्हणून बरं!
अगं, पण चिकन गुनिया होऊन तर दोन वर्षं झाली की!
हो गं, पण तेंव्हापासून माझे सगळे सांधे इतके दुखतात की पावला पावलाला डोळ्यात पाणी येतं बघ. शिवाय नातवंडं लोंबकळली की माझा ‘स्पाँडी’ छळतो गं. अगदी रडायलाच येतं.
बरं, ए आपण जेवून घेऊ या का ? नाहीतरी अजून स्टेजवर कोणीच नाहीये. परत उशीर झाला तर मला रिक्षापण मिळणार नाही कोथरुडला जायला.
तू जेवून घे गं बाई! मी ना हल्ली असल्या फंक्शन्स मधे जेवतच नाही. मला ब्लँड जेवणाची संवय झालीये, हे पदार्थ मला इतके तिखट लागतात. त्यातून गॉल ब्लॅडर काढून टाकलंय ना मागेच, त्यामुळे एका वेळेस अगदी थोडंसच खाता येतं.
बरं, ते जाऊ दे. एकदा ये ना आमच्या घरी डेक्कनला, आमचा बंगला रिनोव्हेट केला नं, त्यानंतर आतलं सगळं इंटिरियर मी माझ्या मनाप्रमाणे करुन घेतलंय. वॉचमनला सांगितलंस ना की तो लगेच फोन करेल मला. मी त्याला दमच देऊन ठेवला आहे तसा. मला नं, उगाच अनोळखी चेहेर्‍याच्या माणसांना दरवाजा उघडायला आवडत नाही. “
पुढचं संभाषण ऐकण्याची इच्छा राहिली नव्हती. मित्राची वाट न बघता सरळ वरच्या मजल्यावर जेवणाकडे मोर्चा वळवला.

Published by

Tirshingrao

I am a Cancerian and pessimistic in nature.

यावर आपले मत नोंदवा