काही रोचक अनुभव – १

विज्ञानशाखेतली सर्व्वोच्च पदवी घेतल्यावर माझे, नोकरीसंशोधन सुरु झाले. यच्चयावत नातेवाईकांना, मी अध्यापन क्षेत्रांत जाईन, असे वाटत होते. मला मात्र उद्योगक्षेत्रांत आणि त्यांतही, ‘शोध आणि विस्तार’ या क्षेत्रांतच रस होता. त्यादृष्टीने, पहिला चॉईस म्हणजे, त्या क्षेत्रातल्या मातब्बर बहुराष्ट्रीय कंपन्यांवरच माझा डोळा होता. पण काही प्रयत्नांनंतर, अशा कंपन्यांत शिरकाव होणे किती कठीण आहे, याचा मला प्रत्यय आला. लहान कंपन्यांत सहज प्रवेश मिळत असतानाही त्या नाकारुन, या मोठ्या कंपन्यांतच जाण्याचा अट्टाहास मला फार महागात पडला. त्यापैकीच काही रोचक अनुभव, माझे पाय जमिनीवर घेऊन आले.

एका रविवारी, अचानक एक नातेवाईक असलेले, पत्रकार आले. जुजबी गप्पा झाल्यावर त्यांनी माझी चौकशी केली. मी अजूनही नोकरी शोधतो आहे, हे कळल्यावर ते म्हणाले,” तुला कुठल्या कंपनीत जायचे आहे तेवढे फक्त सांग. बाकीचे माझ्याकडे लागले”. मी लगेच, त्यांच्या हातात माझा ‘क्युरिक्युलम व्हायटे’ ठेवला.(खरा उच्चार माहित नाही.) तो पाहिल्यावर त्यांनी तोंड वाईट केले आणि तो वाईट्टै, असे त्यांचे मत पडले. तो त्यांच्या मताप्रमाणे सुधारुन घेतला.
“अरे, त्या जर्मन कंपनीतला पर्सनल मॅनेजर आणि मी, एका ग्लासातले आहोत, आपण त्याला घरी भेटू, तुझे काम नक्की होणार.” या आश्वासनाने माझा चेहेरा उजळला. त्यांनी लगेच त्याची एका सकाळची अपॉईंटमेंट घेऊन मला तयार रहायला सांगितले. “सकाळी सात म्हणजे सातला पोचलं पाहिजे हं आपल्याला! तो वेळेच्या बाबतीत एकदम कडक आहे.” आम्ही टॅक्सी करुन पावणेसातलाच त्याच्या बंगल्यावर पोचलो. नोकराने दार उघडून दिवाणखान्यांत बसवले. साहेब वरुन खाली येईपर्यंत, आम्ही त्यांच्या इंटिरिअरचे निरीक्षण करायला लागलो. बरोब्बर सात वाजता, पांढरा टी शर्ट, पांढरी हाफ पँट घातलेले साहेब, गोल जिन्याच्या पायर्‍या , हरणाच्या पावलाने उतरुन खाली आले. आम्ही सावरुन बसलो. खाली आल्याक्षणी त्यांनी कपाटावरची रॅकेट उचलली आणि, “मी जरा खेळून येतो हां, तुम्ही बसा” असे जाहीर करुन ते दाराबाहेर नाहीसे झाले.

आमचे पत्रकार माझ्याकडे ओशाळं हंसून बघत म्हणाले,” फिटनेसच्या बाबतीत अगदी पर्टीक्युलर आहे तो”. मी मांडीवरची फाईल धरुन अस्वस्थपणे बसून राहिलो. साधारण सव्वा तासाने साहेब आंत प्रवेशले आणि एकाआड एक पायर्‍या चढत वर अंतर्धान पावले. माझी चुळबुळ वाढली होती. पण माझी मध्यमवर्गीय सभ्यता मजबूर होती. अर्ध्या तासाने साहेब खाली आले. “हं, काय काम आहे, लवकर बोला, मला आज खूप मिटिंग्ज आहेत.”

पत्रकारांनी माझी ओळख करुन दिली, येण्याचे कारण सांगितले. ” तुमचा सीव्ही देऊन ठेवा, सध्या व्हेकन्सीज नाहीयेत, जेंव्हा होतील तेंव्हा बघू.” त्यांनी गुंडाळलेच होते. आम्ही काही बोलायच्या आधीच, साहेबांनी टाईम्स तोंडासमोर धरला होता. आम्हीही मुकाटपणे उठून बाहेर आलो. पत्रकार टॅक्सीत बसताना म्हणाले,” तो नक्की तुझं काम करेल. मी बोलेन त्याच्याशी.” टॅक्सी भुर्रकन निघून गेली. मी समोरच्या फूटपाथवर बस स्टॉप शोधू लागलो!

Published by

Tirshingrao

I am a Cancerian and pessimistic in nature.

यावर आपले मत नोंदवा