आवाज -2

डॉक्टर रावांची अपॉइंटमेंट संध्याकाळी सहाची होती. पण वाटेत ट्रॅफिक जॅम असण्याची दाट शक्यता असल्याने, अर्धा तास लवकरच निघालो. डॉ. राव, कान, नाक, घशाचे तज्ञ होतेच, पण त्यांनी बहिर्‍या लोकांसाठी एक औषध तयार केले होते. त्यामुळे कदाचित, त्यांना नोबेल देखील मिळण्याची शक्यता होती. त्यांच्या औषधाने बहिर्‍या लोकांच्या श्रवणक्षमतेत लक्षणीय सुधारणा होत असल्याचे रिपोर्ट होते. अशा लोकांची, महागड्या श्रवणयंत्रापासून मुक्तता झाली होती. अनेक लोकांना चांगला अनुभव आल्याने, त्यांची भेट घेणं, म्हणजे मोठे दिव्य होते. दोन महिन्याच्या प्रतीक्षायादीला सामोरे जावे लागे. पण, माझा उद्देश वेगळा असल्याचे फोनवर सांगितल्याने, त्यांनी मला वेळांत वेळ काढून बोलावले होते.
बरोब्बर पावणेसहा वाजता मी त्यांच्या कडे पोचलो. साधारण दहा मिनिटे वाट पाहिल्यावर मला आंत प्रवेश मिळाला.
” बोला, काय प्रॉब्लेम आहे तुमचा ” डॉक्टरांनी विचारले.
” डॉक्टर, मला कमी ऐकू येण्याची काहीच तक्रार नाही. उलट, मला सगळ्याच आवाजांचा फार त्रास होऊ लागला आहे. तशी अनेक वर्षे, मी आपल्या देशांतल्या सोशल ईव्हिल्सचा सामना केला आहे. गोविंदा, गणपती उत्सव, नवरात्र, दिवाळीतले फटाके, मिरवणुका वगैरे, अनेक वर्षं सहन केले आहेत. पण आता, वय वाढलं तसं, हे सगळं सहन करण्याची ताकद माझ्यांत उरली नाहीये. पूर्वी मला वाटायचं की हे सगळं, इतकी वर्षे कानावर झेलल्यावर मी म्हातारपणापर्यंत बहिरा होईन. पण तसं काही झालं नाही. उलट माझ्या कानांची क्षमता वाढली की माझ्या मेंदूत काही बदल झाले, ते मला कळत नाही. पण, आताशा, मला फेरीवाल्यांचा आवाजही अस्वस्थ करतो. ढोल वाजायला लागले की छातीत धडधड होऊ लागते. लांबवर अ‍ॅटम बाँब वा हजार फटाक्यांची माळ वाजू लागली तरी कानात बोळे घालावेसे वाटतात. एवढंच काय, बायकोलाही अनेक वेळा, हळू बोल, असे सांगावे लागते. त्यानंतर होणारे स्वयंपाकघरातले भांड्यांचे आवाज, माझे बी.पी. वाढवतात. मला गाणे ऐकण्याची खूप आवड आहे, पण हेडफोन तर सोडाच, स्पीकरचा आवाजही मी इतका कमी ठेवतो की बाकीचे मला वेड्यांत काढतात. म्हणून मला तुमची मदत हवी आहे.”
” मी तुम्हाला , याबाबतीत कशी मदत करणार ? आवाज कमी ऐकू येण्याचं कोणतंच औषध माझ्याकडे नाही. तुम्ही, फारतर चांगल्या प्रतीचे ईअर प्लग्ज वापरा.”
” डॉक्टर, मला तुमच्या त्या बहिर्‍या लोकांच्या औषधाचीच मदत होऊ शकेल. त्यासाठीच खास विनंती करायला मी आलोय.”
डॉक्टरांच्या चेहेर्‍यावर भले मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिलेले मला स्पष्ट दिसू लागले.
” असं पहा, हा काही फक्त माझा एकट्याचा प्रॉब्लेम नाही. हल्ली बर्‍याच लोकांना आवाजाचा फार त्रास होतो. पण ते सगळे असहाय्य आहेत. न्यायालये त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. पण राजकारण्यांनी त्यांनाही गुंडाळून ठेवले आहे. तुम्ही जर सहकार्य दिलेत, तर एका समाजकार्याला त्याची मदत होईल.”
” तुम्हाला काय म्हणायचं आहे, ते स्पष्ट बोला. मलाही वेळेची मर्यादा आहे. पण जे मनांत आहे, ते स्वच्छ शब्दांत सांगितले तर आपल्या दोघांचाही वेळ वाचेल.”
” क्षमा करा, डॉक्टर, मी जास्त वेळ घेणार नाही. फक्त एकदाच, माझे म्हणणे ऐकून घ्या. मी पुन्हा तुमच्याकडे त्रास द्यायला येणार नाही. तुमच्याकडे जे पेशंटस येतात, त्यांची साधारण पार्श्वभूमी तुम्हाला कळतच असेल. त्यांतले साधे, कायदा पाळणारे नागरिक सोडून द्या. पण वर्षानुवर्षे स्वतः आवाज करणारे, रस्त्यावर नाचणारे, त्वेषाने ढोल बडवणारे, डीजेलाच सर्वस्व मानणारे असे गोंगाटप्रेमी पण कालांतराने बहिरे होऊन तुमच्याकडे येतच असणार. तर अशा सिलेक्टेड आवाजी पेशंटसना तुम्ही जास्तीचा डोस द्या. म्हणजे उपदेशाचा नाही हं, कारण ते त्यापलिकडचेच असतात. पण तुमच्या जादुई औषधाचा जास्त मात्रेचा डोस द्या. त्यामुळे त्यांना इतर लोकांच्या दुप्पट तिप्पट ऐकू यायला लागेल. थोडक्यांत, ते माझ्यासारखे होतील. त्यांना आवाज असह्य होऊ लागला की आपोआपच ते अशा आवाजी उत्सवातून काढता पाय घेतील. अशा उपद्रवी लोकांची संख्या कमी झाली की एकूणच डेसिबल लेव्हल खाली येईल. समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने, तुमचे बहुसंख्यांवर उपकार होतील, डॉक्टरसाहेब.”
” सॉरी, पण हे मेडिकल एथिक्सच्या विरुद्ध आहे, आणि असे काही मी करणार नाही.”
” अहो, ते कुठले एथिक्स पाळतात, तुम्ही, निदान अशा लोकांना तरी धडा शिकवला पाहिजे. राजकारण्यांना तर, पाचपटीने दिले पाहिजे तुमचे औषध!” मीही वैतागाने म्हणालो. पण डॉक्टर आता आणखी वेळ द्यायला तयार नव्हते.
मी जड पावलांनी दवाखान्याच्या बाहेर पडलो.
या गोष्टीला आता पांच वर्षे झाली. मी अजूनही, ईअर प्लग्जच्या मदतीने सणांचे दिवस कसेतरी काढतो. परवा, कॉलनीच्या गेटशीच दोन तरुण पोरं, माझी वाट अडवून उभी होती. ‘धत्ताड, धत्ताड’ नाचात ते आघाडीवर असायचे. मला पाहिल्यावर त्यांतला एक म्हणाला,
” काका, तुम्ही कुठल्या कंपनीचे प्लग्ज वापरता ते सांगा नं ! आमच्या पैकी बर्‍याच जणांना, हल्ली आवाजाचा फारच त्रास होऊ लागलाय. मायला, मधे काही दिवस कमी ऐकू येत होतं, तेच बरं होतं. फुक्काट महागाची ट्रीटमेंट घेतली. आता जिणं हराम झालाय राव!!!

Published by

Tirshingrao

I am a Cancerian and pessimistic in nature.

यावर आपले मत नोंदवा