रसिकांतले काही ‘अग्रणी’

नुकताच, पार्ल्याच्या एका संस्थेत, लताच्या रागदारीवर आधारलेल्या गाण्यांवर एक सुंदर कार्यक्रम झाला. सादर करणारे , स्वतः रागदारी गाणारे होते. एकेक राग थोडक्यांत गाऊन, त्यानंतर त्यावर आधारित लताचे हिंदी चित्रपटातील एक गाणे लावत होते. हजार रसिकांचा श्रोतुवर्ग, तल्लीन होऊन कार्यक्रमाचा एक भागच बनले होते. अतिशय सुंदर अनुभव होता तो. माझ्या बाजूला एक वृद्ध सरदार बसले होते. निव्वळ गाण्याच्या आवडीने ते लांबून आले होते. रागाचे नांव सांगितले की, कुठले गाणे लावणार, याचा त्यांचा अंदाज वाखाणण्यासारखा होता. काहीही ओळखपाळख नसताना ते माझ्याशी मोकळेपणे संवाद साधत होते. मनांत एक विचार येऊन गेला की, या हिंदी सिनेमाने आपल्या देशांत, राष्ट्रीय एकात्मतेचे काम उत्तम केले आहे. त्यातील मधुर गाण्यांच्या सुरांनी वेगवेगळ्या प्रांतातली अनेक माणसे जोडली गेली आहेत. अर्थातच यात, आपल्या सर्व उत्कृष्ट पार्श्वगायकांचे आणि संगीतकारांचे तितकेच योगदान आहे. या आनंदसोहळ्यामधे आम्ही रसिक अगदी बुडून गेलो होतो. तीन तास कसे गेले हे कळले सुद्धा नाही. तसे आता, कुठले गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, हे घरबसल्या जालावरही कळते. पण त्या रागाचे जिवंत प्रात्यक्षिक आणि लगेच ते गाणे ऐकणे हा अनुभव रोमांचक तर आहेच, त्याशिवाय त्या गाण्याचा राग कायम स्मरणांत ठेवणे जास्त सोपे झाले असे वाटले.

पण, हा कार्यक्रम सुरु होण्याआधी तिथल्या काही ‘रसिकाग्रणींचे’ वर्तन मात्र अतिशय खटकणारे वाटले. असे कार्यक्रम हे बहुधा विनामूल्य असतात. त्यामुळे गर्दी जास्त होणार या हिशोबाने मी, चांगला अर्धा तास आधी, त्याजागी पोचलो. एका हॉलच्या मध्यभागी पण कडेला, सादर करणार्‍यांसाठी टेबल-खुर्च्या ठेवल्या होत्या. आणि त्याच्या सभोवताली अर्धवर्तुळाकार खुर्च्यांच्या रांगा होत्या. पहिली रांग पूर्ण रिकामी होती. पण ती आमंत्रितांसाठी असते, हे आता अंगवळणी पडले आहे. व्यवस्था चांगलीच होती. पण बर्‍याचशा खुर्च्या भरल्या होत्या. मधेमधे रिकाम्या जागा दिसत होत्या. पण रांगेत आत शिरल्यावर त्या सर्व रिकाम्या खुर्च्या, रुमाल, पिशव्या, डायरी, अशा तत्सम वस्तुंनी ‘आरक्षित’ होत्या. बसलेली मंडळी उच्चभ्रूच होती. पण निर्विकारपणे नकार द्यायला त्यांना कसलाही संकोच वाटत नव्हता. एरवी आरक्षणाविरुद्ध गळे काढणारे, या आरक्षणाला मात्र आपला हक्कच मानत होते. हळुहळू गर्दी वाढत होती. मी एका मागच्या रांगेत, एका विनाआरक्षित दिसणार्‍या खुर्चीवर बसलो. ती का अनरक्षित होती ते वर पाहिल्यावर कळाले. तिथे पंखा नव्हता. कार्यक्रम सुरु होण्याआधीच, सर्व खुर्च्या भरल्या. बरेच लोक उभे राहिले. अगदी पुढे सतरंज्या अंथरुन, आयोजक त्यांच्या परीने प्रयत्न करत होते. पण गर्दीच इतकी होती की त्यांचाही नाईलाज होता. आरक्षित मंडळी मात्र आयत्या वेळेला येऊन आपल्या गोटात येऊन बसली. त्या खास रसिकाग्रणींमधे मला बरेच ओळखीचे चेहेरे दिसू लागले. तो एक, मोठा समुदायच होता. या आधीही अनेक ठिकाणी, हाच समुदाय मला दिसला होता. अशाच एका खाजगी कार्यक्रमाला,’आपले सगळे आले का ?’ असा प्रश्न विचारताना, माझ्याकडे तुच्छ कटाक्ष टाकणार्‍या एक काकूही त्यांच्यात दिसल्या. या सगळ्या रसिकाग्रणींचे व्याकरण फार पक्के असते. कुठलेही गाणे लागले तरी, त्यातील संगीतकार, गीतकार, वादक, चित्रपट आणि पडद्यावर ते कोणावर चित्रित केले आहे याची जंत्री त्यांना ठाऊकच असते. आणि आपले हे ज्ञान, प्रत्येक वेळी पाजळल्याशिवाय त्यांना रहावत नाही. त्यांच्या लेखी, सी. रामचंद्रांना ‘अण्णा’ म्हटले नाही, तर तो अरसिक ठरतो.अर्थातच असे ज्ञान नसलेले, फक्त सुरांत रमणारे लोक यांना तुच्छच वाटतात. अशा प्रसंगी आपण किती ‘पारदर्शक’ आहोत याचा मला साक्षात्कार होतो. कंपूबाजी ही फक्त संस्थळांवर असते असे नाही, तर अशा प्रत्येकच कलादालनात ती असावी असे वाटू लागते.

कार्यक्रमाला आणखी एक वयस्क सरदार आले होते. त्यांनी मात्र, जागा न मिळाल्यामुळे, जरा वरचा आवाज लावल्यावर त्यांना बसायला जागा मिळाली. ते पाहून माझ्या शेजारचे सरदारजी आजोबा, माझ्याकडे बघून मिष्किल हंसले. काही न बोलताच, आम्हा दोन रसिकांचे सूर जुळले होते.

Published by

Tirshingrao

I am a Cancerian and pessimistic in nature.

यावर आपले मत नोंदवा